मुलायम सिंहांच्या रिक्त जागेवर सूनबाई निवडणुकीच्या मैदानात
अखिलेश यादवची मोठी खेळी, विरोधकांना दिला थेट इशारा
उत्तर प्रदेश दि १०(प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने माजी खासदार डिंपल यादव यांना उमेदवारी दिली आहे. डिंपल यादव मुलायम सिंह यांच्या सूनबाई असुन अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत.डिंपल यादव यांच्या उमेदवारीमुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिंपल यादव याआधी कनोजमधून खासदार राहिल्या आहेत.पण २०१९ मध्ये त्यांना तेथून पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे अखिलेश यादव हे पत्नीसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. मैनिपुरीतून १९९६ मध्ये मुलायम सिंह पहिल्यांदा लोकसभेवर गेले. तेव्हापासून यादव कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य या मतदारसंघातून विजयी होत आहे.त्यामुळे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. तेज प्रताप सिंह यादव यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आपल्या पत्नीला तिकीट देत त्यांनी आपल्या कुटुंबातील आणि पक्षातील विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे. डिंपल यादव कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याचाही लाभ त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
डिंपल यादव लग्नाआधी डिंपल रावत होत्या. आॅस्ट्रेलियात शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली आणि पुढे ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. पण वेगळ्या जातीमुळे त्यांच्या लग्नात अडचण होती. पण त्यांनी कुटुंबाला राजी करत २४ नोव्हेंबर १९९९ ला लग्न केले. आता डिंपल यादव पुन्हा एकदा लोकसभेत दिसण्याची शक्यता आहे.