पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी ; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन,महिलेला घेतलं ताब्यात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री ९च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करून दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला असता. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कॉल प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शितल चव्हाण असं या महिलेच नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच कळतय. या महिलेच वय ३४ वर्ष असल्याच समजतय. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.