विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपल्या नेतृत्वात एवढे घवघवीत यश देऊनही आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज होते, असे गेल्या चार दिवसांपासून चर्चिले जात होते. यावर शिंदेंनीच ठाण्यात पत्रकार परिषद देत भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे मोदींना कळविल्याचे सांगितले होते.यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरु झाली होती. परंतू, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आता मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नसल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नसले तरी ते नव्या मंत्रिमंडळात असतील असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर येणे योग्य नाही. यामुळे शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करेल. यामुळे शिंदे सोडून अन्य नेत्याला त्या पदाची संधी दिली जाईल, असेही शिरसाट म्हणाले.यामुळे शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री पदाचा नेता कोण अशीही चर्चा सुरु झाली आहे. यात श्रीकांत शिंदेंचेही नाव पुढे येत आहे. असे झाले तर श्रीकांत शिंदे यांना खासदारकी सोडून द्यावी लागणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
भाजप नवीन मंत्रिमंडळात अर्धी पदे आपल्या पक्षाकडे ठेवू शकते. तर नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तीन मोठ्या खात्यांसह महाराष्ट्रातील १२ कॅबिनेट पदे मिळू शकतात,अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिमंडळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा ही प्रमुख खाती मिळू शकतात, असं बोलले जात आहे.