
ठरल! सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर जयंत पाटील, रोहित पवार राज्यात मंत्री?
दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार?, फडणवीसांचा विरोध डावलत अमित शहांमुळे रोहित पवार मंत्री होणार?
पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज राज्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. हाके म्हणाले की, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद हवं आहे. तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांना राज्यात मंत्रिपद हवं आहे. आज ना उद्या ते मंत्री देखील होतील. मात्र याचा मोठा फटका ओबीसीला बसला आहे. कारण त्यामुळे भाजपमधील गोपीचंद पडळकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे राजकीय नुकसान होणार आहे. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर अशा राज्यातील ओबीसी नेत्यांना भाजपने केवळ मते मिळविण्यासाठी त्यांचा वापर केल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री फडणवीस हे जरी उत्सुक नसले तरी शरद पवार आणि अमित शहा, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असल्याने फडणवीसही यामध्ये काहीही करू शकत नाहीत, असेही हाके यांनी यावेळी म्हटले आहे. या १० वर्षात पवार काका-पुतणे अमित शहांच्या दारात दिसत आहेत, असा टोलाही हाके यांनी लगावला आहे. केंद्रात राष्ट्रवादीला अद्याप मंत्रीपद मिळालेले नाही. तसेच राज्यात देखील अजित पवार गटाची दोन मंत्रीपदे शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. पण हे मिलन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी होणार की नंतर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार कितीही फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत असले तरी ते शहा आणि मोदी यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणताही आव आणण्याच्या भानगडीत पडू नये अशी टिका हाके यांनी केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय पडलावर सुरु झाल्या आहेत.