
ठरल तर! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर या दिवशी फैसला?
न्यायालयाकडून ठाकरे गटाची ती विनंती मान्य, शिंदे गटाची कसोटी?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज उद्या म्हणत म्हणत अखेर निकालाचा तारीख ठरली आहे.शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे सुनावणी घेतली जाईल, असं स्पष्ट करत पुढील महिन्यात १३ जानेवारी २०२३ रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे आता तरी निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी याप्रकरणाची सुनावणी ०१ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. तसेच दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवावे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना ४ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर याप्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. ओण ती पुढे ढकलण्यात आली होती. आता उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी राज्यात असंवैधानिक पद्धतीने आलेलं सरकार असून, या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने १३ जानेवारी ही तारीख दिली आहे. त्यामुळे त्या दिवशी निकालानंतर संक्रात कोणाची आनंदात आणि कोणाची दुखात जाणार याचा फैसला होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाची एक मागणी मान्य करत न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली.यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावाही सांगितला. बंडखोर आमदारांपैकी १६ जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यासह अन्यही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.यावर पुढच्या वर्षी निकाल दिला जाणार आहे.