मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना साथ देऊनही ‘या’ नेत्यांवर ईडीची पीडा कायम
शिंदेंसोबत गेलेले आमदार-खासदार अजूनही चाैकशीच्या फेऱ्यात, नेत्यांचा या साठी शिंदेंकडे तगादा, शिंदे गटात अस्वस्था वाढली?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाला साथ दिल्यानंतर महाविकास आघाडी आणि महत्वाचे म्हणजे ठाकरे गटाकडून ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी ते भाजपासोबत गेल्याचा दावा करण्यात आला होता. अर्थात तो काही अंशी खराही होता कारण शिवसेनेतील अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. पण एकनाथ शिंदे सोबत जाऊनही खासदार आणि आमदार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेले गुन्हे अजूनही मागे घेतलेले नाहीत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, शिवसेनेच्या काही खासदार आणि आमदार, आणि नेत्यांविरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. काहींविरोधात आरोप पत्र दाखल करत संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. पण आता भाजपात येऊन या नेत्यांची ईडी चौकशी थांबली असली तरी गुन्हे कायम आहेत. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी या खासदार आणि आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तगादा लावला आहे. चाैकशी सुरु असलेल्या नेत्यांमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ( सिटी बँक घोटाळा), आमदार प्रताप सरनाईक (एनएसईएल गैरव्यवहार), यशवंत जाधव( बेहिशोबी मालमत्ता), खासदार भावना गवळी( महिला उत्कर्ष प्रतिष्ठान घोटाळा) , तसेच इतर काही नेत्यांवर देखील विविध आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अकरा नेत्यांची नावे जाहीर करत हे नेते लवकरच तुरूंगात जाणार असा इशारा दिला होता. ते सर्व नेते आता महायुतीत आहेत. आणि किरीट सोमय्या देखील आता शांत असतात. त्यामुळे चाैकशी थांबली असली तरीही गुन्हा कायम असल्याने नेते चिंतेत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे देखील ईडीच्या भीतीमुळे बंडखोर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कारण एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल झाली होती. त्या बातमीमध्ये म्हटले होते की, एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातून गायब आहेत. दरम्यान आता निवडणुका जवळ आल्यामुळे गुन्हे आणि न्यायालयातील आरोपपत्र मागे घेण्यात यावेत, यासाठी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तगादा लावला आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून आपण या विषयातून मार्ग काढू, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. पण सत्ता येऊन दीड वर्ष होत आले तरीही त्या नेत्यांविरोधातील गुन्हे अजूनही कायम आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत डिसेंबरअखेर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. त्यात शिंदे अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. कारण पुढील निवडणूकीत वेगळे निकाल लागल्यास पुन्हा ईडीचा फेरा आपल्या मागे लागू शकतो, अशी भीती या नेत्यांना सतावत आहे.