मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिनाभरापासून खोळंबला आहे. पण आता तो या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची आणि मलईदार खाती भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहे. त्यातील गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे.
सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले फडणवीस कोणतं खातं स्वत:कडे ठेवणार? याबद्दल चर्चा सुरु असतानाच त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना ५ वर्ष त्यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते मुख्यमंत्रिपदावरुन दूर झाल्यानंतरही त्यांच्याकडे गृहखात्याची संपूर्ण माहिती होती. सचिन वाझे प्रकरणात याचा अनुभव आला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सत्तेत आलेल्या भाजपला वजनदार खाती मिळणार आहे. गृह-अर्थ-महसूल-कृषी-उच्च आणि तंत्रशिक्षण अशा खात्यांवर भाजप नेत्यांनी दावा सांगितला आहे.चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यांचाही मंत्रिमंडळातील समावेश नक्की आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होईपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्यावरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे.
सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पण त्याचाही काहीही संबंध नसून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा प्रमुख नेत्यांनी केला आहे.