
मंत्रीपद सोडा धनंजय मुंडे यांची थेट आमदारकी रद्द होणार?
हा नियम ठरणार धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणीचा, अजित पवारही अडचणीत? काय आहे नियम?
मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपींविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया या प्रकरणातील चौकशीसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. पण आता धनंजय मुंडे यांची थेट आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.
अंजली दमानिया यांनी मुंबईत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड, जगमित्र शुगर या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे भागीदार आहेत. अशा कंपन्यांना महाजेनको कंत्राट कसे देऊ शकते? महाजेनकोकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झाला आहे. आमदार, खासदार अशाप्रकारे त्यांच्या कंपनीसाठी कोणताही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद या नियमाचे उल्लंघन ठरते. यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडा त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. जगमित्र शुगर मिल्स कंपनीसाठी ६२ कोटींचे कर्ज यांना कोणत्या निकषावर देण्यात आले? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत. ते मोडून काढायचे असतील तर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात टाकले जावे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे. एकंदरीत यामुळे धनंजय मुंडे आणखी अडचणीत आलेत.
वाल्मीक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार, ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, भ्रष्टाचारात बुडाले आहेत असेही त्या म्हणाल्या आहेत.