Latest Marathi News
Ganesh J GIF

जग्गी वासुदेवांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान?

कारवाईची मागणी करत आव्हाडांची सदगुरूंवर टीका, म्हणाले शिवाजी महाराजांचा अपमान...

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सदगुरु जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक अँनिमेशन कथा प्रसारित केली, ज्यात रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत जग्गी वासुदेव यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ईशा फाउंडेशनचे  जग्गी वासुदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. नुकतच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, “जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल”, असा इशारी जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. दरम्यान सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच आदेशाने शिवाजी महाराजांनी राज्य सोडून हाती कटोरा घेत भिक्षा मागितली. असे दाखवण्यात आले आहे.

जग्गी वासुदेव यांना सर्व लोक सदगुरु  या नावाने ओळखतात. ईशा फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या भाषणांमुळे ते कायम चर्चेत राहत असतात. आता त्यांच्यावर आव्हाड यांनी टीका केली आहे. आता सरकार यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!