मुंबई दि ४ (प्रतिनिधी) – शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना होत आला तरी अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. कोणत्या मंत्र्यांकडे कोणता जिल्हा सोपवायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनाची अनेक कामे रखडली आहेत.
शिंदे फडणवीस सरकारचा ९ ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी १८ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्री आणि जिल्ह्यांची संख्या पहाता सध्या एका मंत्र्यांना दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. असे असले तरी अनेक मंत्री हे स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे म्हणून आग्रही आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे आणि अतुल सावे हे तीन मंत्री आहेत. हे तीनही मंत्री औरंगाबादचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून आग्रही आहेत. जळगावच्या पालकमंत्रिपदासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही आग्रही आहेत. माजी कृषिमंत्री दादा भुसे हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे आहे. तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांच्याच नावाची चर्चा आहे. बहुतांश मंत्री हे स्वतः च्या जिल्ह्याचे पालकत्व मिळावे म्हणून आग्रही असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडे कोणता जिल्हा सोपवितात याकडे मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे असले तरीही मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे उस्मानाबाद, उदय सामंत – रत्नागिरी, दीपक केसरकर – सिंधुदुर्ग, सुरेश खाडे – सांगली, शंभूराज देसाई – सातारा, रवींद्र चव्हाण – ठाणे, विजयकुमार गावित – नंदुरबार, राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई शहराचे पालकमंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.