अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद नाव बदलू नका
उच्च न्यायालयाचे आदेश, उस्मानाबाद नावाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रक
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र याच निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाचा आदेश दिले आहे.
केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं. पण यावरून गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचेही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं करण्यात आलं आहे. पण औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यावेळी मुस्लिम बहुल विभागात नावे बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला होता. यावर सुनावणी करत नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरील याचिकेवरील सुनावणी ७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याला केंद्राने मंजुरी दिली. पण या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे.
दुसरीकडे सरकारी कार्यालयांनी देखील नावात बदल केला होता. मात्र उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागाने संबंधित कोणत्याही कार्यालयाच्या नावात बदल करू नये अशी निर्देश दिले आहेत.