वेळकाढूपणा करु नका, आमदार अपात्रेवर लवकर निर्णय घ्या
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावले, या तारखेपर्यंत घ्यावा लागणार निर्णय, सुनावणीत काय झाले?
दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेली सव्वा वर्ष झाले तरी अजूनही अनिर्णित आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय सातत्याने लांबणीवर पडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना चांगलंच सुनावले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयासमोर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक येत्या मंगळवारपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी सादर करावे. अन्यथा आम्हाला ही सुनावणी विशिष्ट कालमर्यादेत पार पाडण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पायमल्ली करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना ही गोष्ट समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे अधिवक्ता यांनी दोघांनी त्यांच्यासोबत बसून त्यांना सर्वोच्च न्यायालय काय आहे? आमचे आदेश पाळलेच गेले पाहिजेत, हे सांगावे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरु असलेल्या सुनावणीचा पोरखेळ थांबवावा. तुम्ही पुढच्या निवडणुका येण्याची वाट पाहत आहात का? हा निर्णय निवडणुकांपूर्वीच घेतला गेला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विलंब करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जयंत पाटील आणि सुनिल प्रभू यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. आता नार्वेकर काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागेल.
दहाव्या परिशिष्टानुसार काम करणाऱ्या लवादामध्ये काहीतरी गांभीर्य असायला हवं. अशा ठिकाणी चाललेल्या सुनावणीमध्ये गोंधळ असू नये. या प्रक्रियेमध्ये आपण विश्वास निर्माण करायला हवा, असंही न्यायालयाने ठणकावले आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर ठाकरे आणि शरद पवार गटाने समाधान व्यक्त केले आहे.