बारामती दि १२(प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक आणि कर्णबधीर मुलांनाही ऐकण्याचा अधिकार असून त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
खासदार सुळे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर, स्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने बारामती येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी आणि वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बारामती येथील राष्ट्रवादी भवन येथे काल (दि. ११) आणि आज (दि. १२) असे दोन दिवस हे शिबीर पार पडले. या शिबिरात पूर्वतपासणी झालेल्या लाभार्थींना तर श्रवणयंत्रे देण्यात आलीच. याशिवाय नव्याने काही लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांनाही या यंत्रांचे वाटप करण्यात आले. पूर्वतपासणी झालेले आणि नवे अशा एकूण २१५ लाभार्थ्यानी या शिबिराचा लाभ घेतला.
स्वरूप चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित मिश्रा, संचालक सुरेश पिल्लै यांच्यासह यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक विजय कान्हेकर, संभाजी होळकर, धनवानकाका वदक, दीपिका शेरखाने, दिपाली पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.