
पावसाची जोरदार बॅटिंगमुळे पुणेकरांची उडाली दैना
पुण्यातील 'या' भागात नागरिकांच्या घरात पाणी, वीजही गुल बघा video
पुणे दि ११ (प्रतिनिधी)- पुण्यात आज अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. खासकरून विकेंड साजरा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.तब्बल दोन ते तीन तास पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती. त्यामुळे पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
हवामान विभागाने ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाच्या बरसलेल्या जोरदार सरीमुळे पुण्यातले रस्ते जलमय झाले होते. तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तसेच रस्ते जलमय झाले त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शहरात चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, पाषाण, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी टी ईवडे रोड, काञज उद्यान या परिसरात पाणी साचले होते तर एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा, ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक भागातील वीज गुल झाली आहे. सध्या अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करीत आहेत. पाऊस जास्त असल्यामुळे पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवार पर्यंत असाच पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ठीक संध्याकाळी ८५६ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. पण नंतर ते वाढवून २,५६८ क्यूसेक करण्यात आले आहड. यामध्ये, पावसाच्या प्रमाणानूसार कमी जास्त बदल संभवू शकतो. असे खडकवासला प्रशासनाने सांगितले आहे.