
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार नाराज?
शरद पवारांसमोर 'या' नेत्याच्या नावाची घोषणा होताच नाराजीनाट्य
दिल्ली दि ११ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. पण या अधिवेशनात पक्षाच्या ध्येय धोरणाची चर्चा होण्याच्या एैवजी अधिक चर्चा ही अजित पवारांच्या नाराजीची झाली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखे बंड अजित पवार करणार का? अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील शीतयुद्ध देखील यानिमित्ताने दिसून आले.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सर्व बड्या नेत्यांनी भाषण केले. मात्र, अजित पवार यांनी भाषणाची संधी न मिळाल्याने ही नाराजी उघडपणे दिसून आली. अधिवेशनच्या समारोपाच्या भाषणासाठी शरद पवार बोलण्यासाठी उभे राहणार होते. त्या अगोदर अमोल कोल्हे यांच्या भाषणाची घोषणा करण्यात आली. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील भाषण करतील अशी घोषणा केली. तेव्हा अजित पवार यांना बोलायला संधी द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. त्यावेळी जयंत पाटील यांच्याही समर्थकांनी जयंत पाटील यांच्या समर्थनात घोषणा केल्या. त्यानंतर अजित पवार खुर्चीवरून उठून गेले. अखेर शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित दादांचे भाषण होईल,’ असं आश्वासन देऊन कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले. अखेर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची समजूत घातली. थोड्याच वेळात अजित पवार पुन्हा व्यासपीठावर आले.पण तोपर्यंत शरद पवारांचं समारोपाचे भाषण सुरू झालं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा अपूरीच राहीली. पक्षात आपल्यापेक्षा जयंत पाटील यांना जास्त महत्व देण्यात येत असल्यामुळे अजित पवार तर गटनेता असूनही संविधानिक पद देताना साईडलाईन करण्यात येत असल्यामुळे जयंत पाटील यांच्यात शीतयुद्ध असल्याचे दिसून येत आहे.
२०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी पक्षात जयंत पाटील गटनेता झाले होते. पण त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी बाजी मारली तर सरकार गेल्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारच निवडले गेले.पण संघटनात्मक पातळीवर जयंत पाटील यांचीच कमांड आहे. त्यामुळे दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध असल्याची चर्चा आहे.