कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे वटवृक्ष मंदिरात खबरदारीचे नियोजन
भाविकांनी खबरदारी घेत स्वामीदर्शनाचा लाभ घ्यावा - महेश इंगळे
अक्कलकोट दि २४(प्रतिनिधी)- कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा जगावर घोंगावत असताना कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने जनतेला केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आपणा सर्वांना कोरोना महामारीस सामोरे जावे लागणार असे वाटत आहे. कोविडच्या नव्या व्हेरियंटने जागतिक पातळीवर थैमान घातले आहे, त्यामुळे देशभरासह आपल्या राज्यात ही चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांची नियमितपणे गर्दी होत असते, त्यामुळे या नवीन व्हेरियंटचा प्रसार होऊ नये याकरिता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
आता नाताळ सुट्टया व नूतन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मंदिरात स्वामी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी होणार आहे. या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये या करीता खबरदारी म्हणून शासनाच्या आव्हानास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना आज तातडीने मास्कचे वाटप करण्यात करण्यात आले. त्याची सुरुवात आज मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी भाविकांना मास्क वाटप करून केले. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोनाच्या गतकाळातील पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ या दोन वर्षात आपल्याला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये मंदिर कित्येक दिवस बंद करणे असेल पुन्हा चालू करणे असेल असे अनेक वाईट प्रसंग अनुभवता आले. आता पुन्हा जागतिक पातळीवर प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केलेल्या आहेत, त्यास अनुसरून मंदिरास येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व स्वामी भक्तांनी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आशा करतो की मंदिरात येणारे सर्व स्वामी भक्त शासनाच्या या सूचनांचे पालन करतील व आपण पुन्हा एकदा या जगातून कोरोनाला निश्चितपणे हरवू अशी अशा व्यक्त करून भाविकांच्या सुरक्षिततेकरिता व कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे प्रादुर्भाव वाढू नये याकरिता वटवृक्ष मंदिरात आलेल्या सर्व स्वामी भक्तांना आज येथे मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले. या पुढील काळात काही दिवस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांना सोशल डिस्टन्सला अनुसरून टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्याचे नियोजन, मंदिरात प्रवेश करत असताना भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून या कामी अमर पाटील यांच्या समिक्षा मेडीकलचे विशेष सहकार्य लाभले आहे. येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांनी प्रशासनाच्या व मंदिर समितीच्या सूचनांचे पालन वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर करण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अमर पाटील, प्रसाद सोनार, नागनाथ गुंजले इत्यादी उपस्थित होते.