पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकत कामगारांवर कोयत्याने हल्ला
पुण्यात कोयता गँगची दहशत कायम, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत असणाऱ्या तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ५ जणांनी सशस्त्र दरोडा टाकून २२ हजार रुपये लुटले. तसेच तीन कामगारांसह एका सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
योगेश विनायक हिंगे यांनी दरोडेखोरांविरोधात भोर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाच जण दोन दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी सुरक्षारक्षक भरत परिहार यांच्या हाताला पकडून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये आणले. त्यानंतर तेथील कॅश द्या, असे ओरडत शिवीगाळ केली. त्यांनी २१,८०० रुपये रक्कम लुटत कोयत्याने सुरक्षारक्षक व इतर तीन कामगारांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेने पलायन केले. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व संजय सुतनासे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके रवाना झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.