माजी डीएमके नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती केली. जप्त केलेल्या संपत्तीत रेसीडेंसी हॉटेल, आलिशान बंगला, जाग्वर, मर्सिडिज सारख्या ७ महागड्या कार यांचा समावेश आहे. बेकायदेशीररित्या ही संपत्ती जमा केल्याचा आरोप ईडीने लावला आहे.
ईडीने सादिक आणि त्यांचे सहकारी यांची ५५.३० कोटींची संपत्ती ताब्यात घेतली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट स्यूडोएफेड्राईन, केटामाइनच्या तस्करीच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. एनसीबी, कस्टम विभागाच्या तपासाच्या आधारे ईडीने तामिळनाडूतील १५ ठिकाणी धाड टाकली. या संपत्तीचा मालक जाफर सादिक असल्याचं समोर आले. ईडीच्या तपासात जाफर सादिक त्याचा भाऊ मोहम्मद सलीम आणि अन्य लोकांसोबत मिळून स्यूडोएफेड्रीन आणि अन्य नशेचे पदार्थ निर्यात आणि तस्करी करण्यात सहभागी होते. ईडीनुसार, हे दोन्ही भाऊ अन्य साथीदार आणि नातेवाईकांसोबत अनेक फर्म, संस्था, कंपन्यांमध्ये भागीदार होते. याचा वापर गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यासाठी केला जात होता.
ही संपूर्ण यंत्रणा बेकायदेशीरपणे ड्रग्स तस्करीच्या माध्यमातून मिळणारा पैसा वेगळ्या मार्गाने चलनात आणण्यासाठी केला जायचा. त्यासाठी जाफर सादिकला ईडीने २६ जून २०२४ ला अटक केली होती. त्यानंतर १२ ऑगस्टला त्याचा भाऊ मोहम्मद सलीमला ईडीने अटक केली. ईडीच्या तपासात समोर आलंय की, जाफर सादिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ड्रग्सच्या व्यवसायातून बेकायदेशीर कमावलेला काळा पैसा रिअल इस्टेट, फिल्मनिर्मिती, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्ससह अनेक व्यवसायात गुंतवला होता. बँक खात्याच्या माध्यमातून एक नेटवर्क तयार करण्यात आले त्यात या पैशांचा वापर केला गेला. सादिक आणि त्याच्या कुटुंबाच्या खात्यातही पैसे पाठवले गेले. अवैधरित्या पैसे जमा केले असं तपासात उघड झाले.