पत्नीला एकाने पळवून आणल्याचा संशय ; संतापलेल्या पतीने तरुणावर चाकूने वार करून केला जीवे मारण्याचा प्रयत्न
ते दोघेही पश्चिम बंगालमधील मुळचे राहणारे, दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात चिकन विक्रीच्या दुकानात काम करतात. भिवंडीतील एकाला त्याच्या पत्नीला काळेवाडी येथील एकाने पळवून आणले असा संशय होता. त्यावरुन तो काळेवाडीला आला होता. त्याने तरुणावर चाकूने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिसांनी साबुर बाबर अली (वय ३६) याला अटक केली आहे. याबाबत शहादत सलामत शेख (वय २२) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मुळचे पश्चिम बंगालमधील राहणारे असून एकमेकांच्या जवळच्या गावात राहतात. साबुर अली याची पत्नी काही दिवसांपूर्वी कोणालाही काही न सांगता पळून गेली. तिला शहादत शेख याने पळवून नेले, असा साबुर याला संशय होता. त्यासाठी तो पुण्यात आला. ३ सप्टेबर रोजी रात्री सव्वादहा वाजता त्याने काळेवाडीतील पावर चिकन येथे शहादत याला गाठले. त्याला आपल्या पत्नीविषयी विचारले.
तेव्हा त्याने आपल्याला काही माहिती नाही. तुझ्या पत्नीला मी पळविले नाही, असे सांगितले. पण, त्याच्यावर विश्वास न बसल्याने साबुर अली याने आपल्याकडील चाकूने शहादत याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. शहादत याने तो चुकवत असताना तो वार त्याच्या मानेवर बसला. त्यानंतर त्याने शहादतच्या डाव्या हाताच्या खांद्यावर, दंडावर, मनगटावर, हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साबुर अली याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.