
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री खासदाराला ईडीने बजावली नोटीस
नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप, चाैकशीचा फेरा लागणार, केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष होणार?
कोलकत्ता दि ८(प्रतिनिधी)- ईडीचा वापर विरोधकांच्या विरोधात होत असल्याचा आरोप देशात सातत्याने होत असतो. महाराष्ट्रात तर अनेकांना जेलवारी देखील करावी लागली आहे. पण आता एका महिला खासदारावर ईडीने आपला मोर्चा वळवला आहे.तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांना ईडीने समन्स बजावले असून १२ सप्टेंबरला चाैकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
नुसरत जहा लोकसभेच्या खासदार आहेत. त्याचबरोबर त्या अभिनेत्री देखील आहेत. त्यांच्यावर न्यू टाऊन येथे ज्येष्ठ नागरिकांना सदनिका देण्याचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी फसवणूक केल्याचा आरोप आहे. कारण त्या या कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान कथित फसवणुकीच्या वेळी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नूसरत जहॉं या कंपनीच्या संचालक मंडळावर होत्या. त्यामुळे ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. असा दावा ईडीने केला आहे. सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने गुंतवणुकदारांना, ज्येष्ठ नागरिकांना चार वर्षात वाजवी किमतीत निवासी सदनिका देण्याची हमी दिली होती. यानुसार कोट्यवधी रुपये गोळा केले होते. मात्र त्यांना अद्याप सदनिका मिळालेल्या नाहीत. या कंपनीवर सदनिका विक्रीत वीस कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. भाजपा नेते शंकुदेव पांडा यांनी वैयक्तिक स्तरावर ईडी कार्यालयात तक्रार नोंदविली होती. ईडीने कॉर्पोरेट कंपनी सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे आणखी एक संचालक राकेश सिंह यांनाही चौकशीस हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. तत्पूर्वी गेल्या महिन्यात एका पत्रकार परिषदेत नुसरत जहाँ यांनी कोणत्याही फसवणुकीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांचा इन्कार केला होता. तरीही तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सुमारे ४२९ कर्मचार्यांनी फ्लॅटसाठी ९ वर्षांच्या काळात हप्तेवारीत संपूर्ण पैसे कंपनीत जमा केले, परंतु आजतागायत लोकांना फ्लॅटही मिळाला नाही किंवा पैसेही परत मिळाले नाहीत. अलीपूर न्यायालयाने ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. दरम्यान इतर सदस्यांविरोधातही विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.