राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या घर कार्यालयावर ईडीची छापेमारी
कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोपामुळे अटकेची शक्यता, राष्ट्रवादीत खळबळ
कोल्हापूर दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळीच ईडीने छापा टाकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयांचीही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. त्याचबरोबर पुण्यातील हडपसर मधील अॅमनोरा आणि कोंढव्यातही ईडीची छापेमारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते.त्यांनी १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून, यात हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगाही सहभागी असल्याचे आरोप सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांनी २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न करता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना मुश्रीफांच्या जावायाची कंपनी ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला होता. असाही आरोप सोमय्या यांनी केला होता.हसन मुश्रीफ यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नेत आहेत. ते शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. ईडीचा आजवरचा अनुभव पाहता छापेमारीनंतर अटकेची कारवाई करण्यात येते. त्यामुळे आजच्या धाडसत्रानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.