Latest Marathi News

सत्ताधारी भाजप – शिंदे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

ही तीन कारणे ठरली वादाची, ..अन्यथा वाद वाढण्याची शक्यता

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत येऊन सहा महिने झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील वाद आता उघडपणे समोर येत आहेत. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर उमेदवार भाजपाने परस्पर जाहीर केल्याने शिंदे गटात नाराजी आहे. तसेच देवेन भारती यांची नियुक्तीही त्या नाराजीला कारणीभूत आहे तर कवाडे गटासोबत युती केल्याने भाजपाही शिंदे गटावर नाराज आहे.

भाजपाने विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक विधानपरिषद संदर्भात एक दोन दिवसांत होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.पण नाशिक आणि कोकण या दोन जागा शिंदे गटाला हव्या आहेत. परंतु भाजपने शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस दलात देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा न करता परस्पर हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यामुळे या निवडीवर एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी कवाडे गटासोबत युती केली आहे. त्यामुळे भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जोगेंद्र कवाडे यांना घेताना माझ्याशी चर्चा करायला हवी होती, त्यांना घेण्याची गरज नाही, असे रामदास आठवलेही म्हणाले होते. त्यामुळे ही धुसफूस चर्चेचा विषय बनली आहे.

भाजप आणि शिंदे गटामध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे नाशिकची जागा तरी शिंदे गटाला मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण भाजप सध्या तरी शिंदे गटाच्या वरचढ असल्याचे दिसून आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!