मुंबई दि २० (प्रतिनिधी)- भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असले तरीही महत्वाची खाती स्वतः कडे ठेवत सत्तेची सूत्रे आपल्या हाती कशी राहतील याची पुरेपुर काळजी घेतली आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपानंतर. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशा आली. पण यामुळे राज्य कारभार करताना शिंदेची गोची होणार असून फडणवीस किंग ठरणार आहेत.
मंत्रिपदाच्या वाटपानंतर शिंदे गटाच्या पदरी निराशा पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खात्यांचा पदभार आहे. यातील नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प) अर्थात एमएसआरडीसी ही खाती शिंदे यांच्याकडे यापूर्वीही होती. ३ खात्यांव्यतिरिक्त एकही विशेष महत्त्वाचे खाते शिंदे यांच्याकडे नाही. उद्योग, कृषी, आरोग्य ही तीन महत्त्वाची खाती सोडली तर एकही महत्त्वाचे खाते शिंदे गटाकडे आलेले नाही.महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी निधी वाटपावरुन अजित पवारांवर टीका केली होती. पण तिच परिस्थिती आज भाजपाच्या बाबतीत आहे.भाजपाकडे आलेली खाती पाहता राज्याच्या अर्थसंकल्पात जवळपास ८० टक्के निधी भाजपच्याच खात्यांना मिळणार आहे.
शिंदे गटातील मंत्र्यांकडे आलेली खाती एकदा पाहिली तर त्यांना भोपळाच मिळाल्याचे दिसून येते. दादा भुसे जे ठाकरे सरकारमध्ये कृषी मंत्री होते आज त्यांच्याकडे बंदरं आणि खनिकर्म खातं देण्यात आलंय. म्हणजे त्यांचे डिमोशन झाले आहे तर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड अन्न व औषध प्रशासन, संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, ही ठाकरे सरकारमधील खाती कायम ठेवली आहेत.तर अब्दुल सत्तारांकडे कृषी, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा, शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क अशी खाती मिळाली आहेत.

दुसरीकडे फडणवीसांनी स्वत:कडे अर्थ, गृह, विधी व न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशी महत्वाची वजनदार खाती ठेवली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवारांकडे वन आणि सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, चंद्रकात पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण अशी महत्वाची खाती भाजपाकडे आहेत, भाजपाला मिळालेली खाती पाहता सर्वाधिक निधी भाजपाकडेच राहील याची पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे.त्यामुळे शिंदे गटानं बंड करुन पुन्हा सत्तेत सामील झाले असले तरी याचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला आहे. त्यामुळे भाजपा तुपाशी तर शिंदे गट उपाशी अशी अवस्था झाली आहे.
राज्याची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी प्रशासन आणि व्यवहार आपल्याच हातात राहील याची काळजी फडणवीसांनी घेतली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर शिंदे गटात नाराजी उघडपणे दिसून आली पण कोणतेही आमदार नाराज नाहीत असं स्पष्टीकरण शंभुराज देसाई यांनी दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडताना दिसू शकणार आहेत. पण सीएम जरी एकनाथ शिंदे असले तरीही फडणवीस मात्र सुपर सीएम ठरले आहेत.