
मुंबई दि ३० (प्रतिनिधी) – योगगुरु रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ रामदेव बाबांनी शिंदेंचीही भेट घेतल्याने वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे.
भेटीनंतर रामदेव बाबांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदेंचे काैतुक केले. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर संवाद साधला. खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया रामदेव बाबांनी दिली आहे. दोन दिवसात दोन महत्वाच्या भेटी घेतल्याने या भेटीत कोणती चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही.
नागपूरात रामदेव बाबांच्या पतंजलीचा एक प्लांट कार्यरत आहे. त्या कामात त्यांना फडणवीसांनी मदत केली होती. पण रामदेव बाबा ख-या अर्थाने योग आणि काळ्या पैशाविरुद्धच्या आंदोलनामुळे चर्चेत आले होते. पण त्यांच्या या राजकीय विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण मात्र पेटण्याची शक्यता आहे.