एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा ; मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार ?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ११.१५ च्या दरम्यान राजभवन गाठलं. एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला.यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आज राजभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे