भाजपच्या ‘नव्या’ फॉर्म्युल्याने महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुटणार ? एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री
विधानसभेतील महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याचा आग्रह शिवसेनेचे आमदार करत आहेत, तर भाजपमधील फडणवीस समर्थक गट देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहण्यास इच्छुक आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही (एनसीपी) पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.याच पार्श्वभूमीवर, फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा निकालानुसार, भाजपने सर्वात जास्त १३२ जागांवर विजय मिळवला आहे, शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला आहे.या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक नवीन फॉर्म्युला चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिली जाऊ शकते, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. याशिवाय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील, असा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे.भाजपकडून या फॉर्म्युलाद्वारे तिन्ही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिंदेंना डावलल्याचे नॅरेटिव्ह तयार न होता सत्तासंघर्ष सुटण्याची शक्यता वाढेल.
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून दूर करणे भाजपसाठी सहजसोपे नाही. शिंदे हे मराठा असून मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजाचा रोष भाजपला नको आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेवर आजपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व होते, परंतु यावेळी भाजप सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नव्हता, मात्र महायुतीने संपूर्ण प्रचार शिंदेंच्या नेतृत्वाखाली केला होता.आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीत सध्या सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा वळण मिळण्याची शक्यता दाट झाली
आहे.