निवडणूक आयोगाची धनुष्यबाणबद्दलची सुनावणी लांबणीवर
चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता दोन्ही गटाकडून या चिन्हांना पसंती
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रिय निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी आज होणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. दोन्ही गटांनी आयोगासमोर कागदपत्रे सादर केली आहेत.
शिंदे गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुमारे दीड लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने ८ ते ९ लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. पक्षातील बहुमत कोणाकडे आहे या मुद्द्याआधारे निवडणूक आयोग साधारणपणे निर्णय घेत असतो. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची सुनावणी महत्त्वाची होती. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर असलेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधिमंडळ पक्ष सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचे शिंदे गट सातत्याने सांगत आहे, तर शिवसेना पक्षाची कार्यकारिणी व पदाधिकारी हे आपल्यासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी नव्या चिन्हांचा शोध सुरु आहे. निवडणूक आयोग आता सुनावणी कधी घेणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचार सुरु आहे. ठाकरे गटाकडून सध्या ढाल आणि तलवार चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. दसरा मेळाव्यात त्यांना गदा देण्यात आली होती. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक आहे.दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या स्टेजच्या समोर भलीमोठी तलवार ठेवण्यात आली होती.