
थेट जेलमधून महापालिकेच्या सभेत एन्ट्री! सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. आजच्या या सर्वसाधारण सभेला नगरसेवक सासू लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर आज पुन्हा ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर कारागृहात असल्यामुळे त्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील सर्वसाधारण सभेला देखील आंदेकर सासु-सुन ऑनलाइन उपस्थित होत्या. आजच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणीपुरवठा संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावत आहेत. या दोघीही आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आहे. सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतर तुरुंगातूनच ऑनलाइन सभेत सहभाग नोंदवता येत आहे. सोनाली आंदेकर या दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत. तर लक्ष्मी आंदेकर या बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील आहे. या दोघींनीही तुरुंगातूनच निवडणूक लढवत राजकीय उपस्थिती कायम ठेवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरूंगात असताना महापालिका निवडणुकीत निवडून आल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग तीन महिने हजर राहिले नाही तर नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली. त्यानंतर आज देखील त्या व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावणार आहेत, आंदेकर या गेले दोन महिने पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होत्या.

प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती, मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.


