माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश?
काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या त्या निर्णयामुळे घेतला निर्णय,भाजपाकडून मोठी संधी?
दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाला लागलेली २०१४ पासूनची घरघर अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. कारण अनेकजण पक्षाची साथ सोडत आहेत.संयुक्त आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
किरण कुमार रेड्डी यांनी संयुक्त आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. २०१० ते २०१४ या कालावधीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. रेड्डी यांचा तेलंगाना निर्मितीला विरोध होता.पण केंद्रातील यूपीए सरकारनं आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय घेत दोन राज्यांची निर्मिती केली होती. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावाला विरोध करत किरण कुमार रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी जय समैक्य आंध्र पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा आपला पक्ष विसर्जित करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आताही किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे.”मी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा,” असे रेड्डी यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जबाबदारी मिळेल, अशी आशा रेड्डी यांना होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते पक्षात सक्रीय नसल्यानं त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. आता किरण कुमार रेड्डी हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपाची स्थिती यथातथाच आहे. त्यामुळे रेड्डी यांच्या रूपात पक्षाला एक मोठा चेहरा मिळू शकतो. अविभाजित आंध्र प्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम किरणकुमार रेड्डी यांच्या नावावर आहे.
रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षाकडून सर्व काही मिळवले आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम केलं त्यांना आता भाजपमध्ये जावे. असे मत लोकसभा खासदार मणिकम टागोर यांनी व्यक्त केले आहे.