बिहार- बिहारच्या सहरसा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला सरप्राईजचं आमिष दाखवून माहेरीहून सासरी बोलावून घेतलं. त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने तीस वर्षीय पत्नीला तिच्या माहेरून आपल्या घरी आणलं आणि तिला मोठं सरप्राईज देणार असल्याचं सांगितलं. मात्र, माहेरून महिला सासरच्या घरी पोहोचताच तिची हत्या करण्यात आली.
महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या आई-वडिलांना मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती देण्यात आली होती. मुलीचा मृतदेह पाहून घरातील सदस्यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींच्या घरात घुसून प्रचंड गोंधळ घातला आणि हाणामारी व तोडफोड सुरू केली. दीपा कुमारी असं महिलेचं नाव असून नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळ गाठून हुंड्यासाठी छळ करणारा पती राहुल गुप्ता याला अटक केली. पोलिसांनी आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपा कुमारीचं लग्न 2 वर्षांपूर्वी राहुल गुप्तासोबत झालं होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच त्याने हुंड्यासाठी महिलेचा छळ सुरू केला. त्यानंतर महिला तिच्या माहेरी गेली. दरम्यान, पती राहुल गुप्ता याने पत्नीला मारण्यासाठी एक कट रचला. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसेल. पत्नीला सरप्राईज देण्याचे आमिष दाखवून आरोपी पतीने आपल्या लहान भावाला सासरी पाठवलं आणि पत्नी दीपा कुमारीला तिच्या माहेरून घरी आणायला सांगितलं.
आरोपी पती राहुल गुप्ता आणि सासरच्या मंडळींनी दीपाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दीपा कुमारीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की त्याने तिला सरप्राईज देणार असल्याचं सांगितलं. दीपाला सासरी आणल्यावर सासरच्यांनी तिची हत्या केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलगी दीपा कुमारी हिच्यासोबत सातत्याने मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.