
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पावसाळ्यातील वाढती आर्द्रता आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्य समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता ‘आय फ्लू’ म्हणजेच कन्जंक्टिव्हायटिस या डोळ्यांच्या अत्यंत संसर्गजन्य आजाराने पाय पसरले आहेत. शहरात घरोघरी आणि विशेषतः शाळकरी मुलांमध्ये या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्याने आरोग्य प्रशासन आणि नेत्ररोगतज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘आय फ्लू’ची प्रमुख लक्षणे

हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खूप वेगाने पसरतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला खालील लक्षणे जाणवत असतील, तर अजिबात दुर्लक्ष करू नये

डोळे लाल होणे: डोळ्यातील पांढऱ्या भागावर लालसरपणा किंवा गुलाबी रंग येणे.
जळजळ आणि खाज: डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे किंवा टोचल्यासारखे वाटणे.
पाणी व चिपड येणे: डोळ्यांमधून सतत पाणी वाहणे आणि पिवळसर चिपड (Pus) येणे.
पापण्या चिकटणे: विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यानंतर दोन्ही डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे.
परस्पर ‘स्टेरॉइड ड्रॉप्स’ वापरणे ठरेल धोकादायक!
अनेक नागरिक डोळे लाल झाल्यानंतर किंवा त्रास सुरू झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मेडिकल स्टोअरमधून कोणतेही आय ड्रॉप्स आणून डोळ्यात टाकतात. नेत्ररोगतज्ज्ञांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून परस्पर आणलेले स्टेरॉइडयुक्त आय ड्रॉप्स (Steroid Eye Drops) वापरणे डोळ्यांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे डोळ्यांच्या बाहुलीला कायमची हानी पोहोचू शकते किंवा दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांनाच दाखवावे.
संसर्ग रोखण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या
आय फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुण्याची सवय ठेवा किंवा सॅनिटायझर वापरा. अस्वच्छ किंवा न धुतलेल्या हातांनी डोळ्यांना अजिबात स्पर्श करू नका. स्वतःचा रुमाल, टॉवेल, उशीचे कव्हर किंवा चष्मा इतरांना वापरू देऊ नका. जर तुम्हाला संसर्ग झाला असेल, तर घरातील इतरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून काळा चष्मा वापरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

