
पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडिओ फेसबुकने हटवला!; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘मेटा’ प्रमुखांना समन्स
नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन तीव्र झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, हा राजीनामा होण्यापूर्वी, तो टाळण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न सुरू होते.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जुलैच्या मध्यरात्री एक महत्त्वाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पेपरफुटी करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे सांगत कठोर कारवाईचे आश्वासन देशवासीयांना दिले होते. मात्र, पंतप्रधानांचा हा अधिकृत व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’ने (Facebook) अचानक हटवला, ज्यानंतर आता इंटरनेट जगतात आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

‘फेसबुकला हा अधिकार दिला कुणी?’ – भाजप आक्रमक

भारताच्या पंतप्रधानांनी पोस्ट केलेला व्हिडिओ फेसबुकने परस्पर कसा काय हटवला? फेसबुकला असा अधिकार नेमका कोणी दिला? असे संतप्त प्रश्न उपस्थित करत भाजप नेत्यांसह नागरिकांनी फेसबुकवर टीकेची झोड उठवली आहे. हा व्हिडिओ हटवल्याचे समजताच डिजिटल क्षेत्रात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, काही काळासाठी गायब झालेला हा व्हिडिओ नंतर पुन्हा फेसबुकवर पूर्ववत करण्यात आला. या वाढत्या वादानंतर फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ला (Meta) अखेर जाहीर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
‘मेटा’ने मागितली माफी; दिले ‘हे’ स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी ‘मेटा’ कंपनीने अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. मेटाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “पंतप्रधानांचा व्हिडिओ काही काळासाठी हटवला गेला होता, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हा प्रकार एका तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) घडला होता. आमचा कोणताही चुकीचा उद्देश किंवा हेतपुरस्सरपणे हा व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न नव्हता.
केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; मेटा प्रमुखांना थेट समन्स!
मेटाने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले असले तरी केंद्र सरकारने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या अकाऊंटवरून अशा प्रकारे व्हिडिओ हटवला जाणे ही सुरक्षेच्या आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने मोठी बाब मानली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने थेट पाऊल उचलत ‘मेटा’ आणि ‘इन्स्टाग्राम’च्या ग्लोबल (जागतिक) प्रमुखांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी आता केंद्र सरकार कोणती कडक भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

