पुणे दि ६(प्रतिनिधी) – पुण्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड अचानक मधोमध तुटलं आणि मानकरी थेट आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले.सुदैवाने सर्वजन सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पारुंडेत दरवर्षी ब्रह्मनाथ यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेतील बगाड हे नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. यात्रा सुरू असताना अनेक लोकांनी बगाड पाहण्यासाठी गर्दी केलेली असतानाच अचानक बगाडचा मधला भाग तुटून पडला. त्यामुळं त्यावरील मानकरी दहा ते बारा फुटांवरून खाली कोसळले. पारुंडे येथील ग्रामपंचायतीसमोर ही थरारक घटना घडली आहे. त्यानंतर भाविकांसह स्थानिक नागरिकांनी तातडीनं बगाडच्या दिशेनं धाव घेतली.सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. असे असले तर या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप आणि संदीप चिलप हे दोघे या बगाडाला लटकलेले होते.या अपघाताच थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान यात्रेत नेमकं काय झालंय, हे न समजल्यानं भाविकांमध्ये मोठी धावपळ झाल्याचं पाहायला मिळाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. तसेच स्थानिकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त बगाड मार्गातून हटवण्यात आल्यानंतर ब्रह्मनाथ यात्रेतील पुढील विधी सुरळीत पार पाडण्यात आले.
करोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पुणे जिल्ह्यात यत्रांचा हंगाम सुरू आहे. यात्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अनेक नागरिक गावाकडे यात्रेसाठी येतात. यावेळी बैलगाडा शर्यत, कुस्ती विविध प्रकारांनी यात्रा सजलेली असते. पण पारुंडे गावात बागड यात्रेला मात्र गालबोट लागले आहे.