
मुंबई दि ५(प्रतिनिधी) – मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत ५ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास झाला. चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 6 जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी आधीच वाहनाचा अपघात झाला होता, जखमींना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. जखमींना रुग्णवाहिकेतून नेण्याआधीच अपघातग्रस्त कार आणि रुग्णवाहिकेला आणखी तीन कारची धडक बसली. यानंतर सी लिंकवर गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की पाचही गाड्यांचा चक्काचूर झाला. या हृदयद्रावक अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे. येथे खबरदारी म्हणून वांद्रे ते वरळी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
या आधीही या लिंकवर बरेच अपघात झाले आहेत. वास्तविक या लिंकवर वाहने उभी करण्यास मनाई आहे. तरीही काही जण गाडी उभी करुन होते. नेमके याच गाड्यांना धडकून हा अपघात झाला. दरम्यान जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.