Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदेच्या तोफा धडाडणार

दसरा मेळाव्याच्या आखाड्यात ठाकरे आणि शिंदे गटाच्या 'या' गोष्टी लक्ष वेधणार

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ऎतिहासिक फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी गर्दी जमविण्यावर भर देण्यात आला असून, या मेळाव्यांत दोन्ही बाजूने आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. आपला दसरा मेळावा भव्य असावा यासाठी दोन्ही कडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने १८०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरल्याची चर्चा आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पारंपारिक पद्धतीने होणार असला तरी टीकेचा प्रमुख रोख शिंदे गट आणि भाजपवर असणार आहे. गद्दारांना निवडणुकांमध्ये धडा शिकवा, याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका होण्याची शक्यता आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारी आणि विषमता यांबाबतही आरएसएसचा दाखला देत केंद्रावर प्रहार होण्याची शक्यता आहे.ठाकरे यांच्यानंतर शिंदे यांचे भाषण होईल आणि त्यात ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शिंदे गटाची योजना आहे. परंतु, ठाकरे यांनीही उशिरा भाषणाला सुरुवात केल्यास ठाकरे आणि शिंदे या दोघांचे भाषण एकाच वेळी होऊ शकते.


शिंदे गटाच्या मेळ्याव्यात ५१ फुटी तलवार ठेवण्यात आली आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यावेळी १२ फुटांची चांदीची तलवार भेट देणार असल्याची चर्चा आहे. आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!