Latest Marathi News

सीना आणि कुकडीच्या आवर्तनापासून अनेक गावे वंचित राहण्याची भीती

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी

कर्जत दि २(प्रतिनिधी)- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत – जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून दिले आहे.

कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतु सद्यस्थितीत योग्य नियोजनाअभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भोसे खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. जेणेकरुन सीना कालव्याचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडता आले असते आणि कालव्याच्या शेवटच्या गावांनाही पूर्ण दाबाने सिंचनासाठी पाणी मिळाले असते. परंतु ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सध्या सीना कालव्यातून आवर्तन सोडलेले असतानाही ते पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे निमगांव डाकू, नवसारवाडी, पाटेवाडी, आनंदवाडी, तरडगाव ही अखेरची पाच-सहा गावे या आवर्तनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कुकडी कालव्याच्या १६५ कि.मी.ला जो दाब ६०० ते ६५० क्यूसेक्स पाहिजे तो अजूनही ४०० क्यूसेक्सच्या पुढे गेलेला नसल्याने कुकडी लाभक्षेत्रातील टेलच्या भागात आजपासून सिंचनासाठी सुरवात व्हायला पाहिजे होती, ती अजूनही झाली नाही. यामुळे शेतातील उभे पीक आणि फळबागा डोळ्यासमोर सुकत असल्याचे पाहून त्या वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यावाचून लोकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील २२ ते २३ गावंमध्ये टँकरची सोय केली आहे.

भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्याची आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेली मागणी मान्य करुन समितीच्या अध्यक्षांनी जलपसंदा विभागाला तसे आदेश दिले असते तर पाण्याचे योग्य नियोजन करण्यास मदत झाली असती आणि आज पाण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे ती वेळ आमच्या गावांवर आली नसती, अशी शब्दांत टेलच्या गावातील शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या लोकांना आणि जनावरांनाही पिण्याचे पाणी, चारा पिके तसेच फळबागा यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे या आवर्तनाचे योग्य नियोजन केले नाही तर अनेक गावे वंचित राहू शकतात, अशी भीती आहे. परिणामी कुकडी आणि सीना कालव्यावरील गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील चारा पिके आणि बहुवार्षिक पीक असलेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!