पुणे – स्वारगेट पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या स्वारगेट बस स्टॅन्डच्या इनगेटजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
समीर हेमंत कांबळे २८ , रा. सर्व्हे नं. १४ , शंकर महाराज वसाहत, धनकवडी असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तन्मय श्रावण शेडगे २५ , रा. आंबेगाव पठार , गौरव साळुंखे २४ आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास समीर कांबळे हे त्यांच्या रिक्षामध्ये बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना रिक्षाच्या बाहेर ओढले. तुला खुप माज आला आहे, आज तुझ्याकडे बघतोच, आज तुला सोडणार नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. आरोपी तन्मय श्रावणे शेडगेने त्याच्याकडील कोयत्याने समीर यांच्या डाव्या हातावर वार केले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी तेथे उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसची समोरील काच दगड मारून फोडली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.