अखेर त्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरबाबत मोठा निर्णय
एसटी महामंडळ व्यवस्थापकांनी दिला हा आदेश, कंडक्टर म्हणाल्या...
उस्मानाबाद दि १४(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातील निलंबित केलेल्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरला अखेर एसटी महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. बसमध्ये रिल्स बनवल्यामुळे महामंडळाने मंगल सागर गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन केले होते. ते निलंबन अखेर मागे घेतले आहे. त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगल सागर गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये महिला कंडक्टर म्हणून कर्तव्यावर होत्या. तसेच त्या सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असतात. त्या टिक टाॅक स्टार देखील आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी मंगल यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ तुफान गाजला होता. त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट आल्या होत्या. मात्र, त्यांच्या याच व्हिडिओवर आक्षेप घेत एसटी महामंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.पण सोशल मिडीयाबरोबरच काही राजकीय नेत्यांनी महामंडळाच्या या निर्णयावर टिका केल्याने अखेर महामंडळाने त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे.
स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मंगल यांच्याबरोबर त्यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही महामंडळाने निलंबित केलं होतं. पण त्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. मंगल गिरी यांनी निलंबनाविरोधात त्यांना पाठिंबा देणा-यांचे आभार मानले आहेत.