अखेर तो बरसलाच!, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे, या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा, बघा कशी असणार वाटचाल
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून आज महाराष्ट्राभर बरसला आहे. गेली महिनाभर हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा हवामान विभागाला चकमा देत अंदाजाच्या एक दिवस आधीच कोसळधार केली आहे. वरूण राजा अखेर सक्रीय झाला असून कोकणनंतर मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यातील नागरिक उकाड्याने त्रस्त होते. पण १६ तारखेला महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून बरसायचे नाव घेत नव्हता. अखेर आगमनाच्या आठ दिवसानंतर मान्सुनने महाराष्ट्रात दणक्यात आगमन केले आहे. आज सकाळपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. पुढचे ५ दिवस हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर हवामान विभागाने मुंबईला २६-२७ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्येही मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पण पेरणीसाठी शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता. कोकणात ११ जून रोजी मान्सून थोड्याफार प्रमाणात आल्या नंतर १५ जूनपर्यंत राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. पण उद्यापासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज चुकीचा ठरला आहे.