पुणे : पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे.
सुरज तात्याबा लंगार (२१ , रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. एकुण ३ राऊंड फायर केले असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी दिली आहे.
गोळी सुरजला डाव्या बाजूला चाटून गेली असून तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यात भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भर दुपारी वारजे माळवाडी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.