
भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीची बिल्डरला बेदम मारहाण
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, अद्याप पोलिसात तक्रार नाही, आमदारांची 'त्या' वादात मध्यस्थी?
पुणे दि २०(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन दिवसापुर्वी जोरदार राडा पहायला मिळाला होता. जमिनीच्या वादातून भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीने बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असुन तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोराडे यांचे पती नितीन बोराडे आणि बिल्डर नरेश पटेल यांचा मुलगा यांच्यात हा वाद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितिन बोराडे यांचे चुलते रामहरी बोराडे आणि बिल्डर पटेल यांच्यात जमीन व्यवहारातून वाद आहे. त्यावरील सुनावणीसाठी ते पालिकेत आले होते. तेथून ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते बाहरे पडले. या वेळी नितीन बोराडेंचे चुलते आणि पटेल बिल्डरच्या मुलात त्यामुळे वाद झाला. यावेळी बिल्डरच्या मुलाने शिवीगाळ केली, त्यामुळे संतापलेल्या नितीन बोराडे यांनी पटेल यांच्या मुलाला मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितिन बोराडे म्हणाले की, बुधवारी सुनावणी दरम्यान तुम्ही कोर्टात जा किंवा कुठेही जा, मला फरक पडत नाही, असं नरेश पटेल आमच्या काकांना म्हणाले, तसेच बिल्डरच्या मुलाने शिवीगाळ केली. ते सहन न झाल्याने ही घटना घडली असे ते म्हणाले आहेत. दरम्यान या घटनेत पालिका कर्मचारी वा अधिकाऱ्याला मारहाण झालेली नसल्याने त्याबाबत प्रशासनातर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजपा माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत तर भाजपा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आता या प्रकरणी पुढे काय कार्यवाही होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मारहाणीनंतर पिंपरी चिंचवडमधील घाबरलेल्या पटेल समाज बांधवांनी आमदार महेश लांडगेंच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी लांडगे यांनी नरेश पटेलच नाही, तर संपूर्ण पटेल समाजाची जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे आता वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे.