Just another WordPress site

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिवसैनिक काळाच्या पडद्याआड, लग्नाच्या वाढदिवशी अखेरचा श्वास

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे मोठी राजकीय हानी झाली आहे.

GIF Advt

विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. २००२ मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये ते मुंबईच्या महापौर झाले. २०१७ ते २०१९ या कालावधीदरम्यान त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं. तसेच २०१९ त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या मारहान प्रकरणी महाडेश्वर यांना अटक करण्यात आली होती. तसेच अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे विधानसभा मतदार संघातील नेते, शिवसेनेचे खंदे समर्थक, अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. माजी महापौर महाडेश्वर यांच्या निधनाने शिवसैनिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत.

महाडेश्वर उच्चशिक्षित होते. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसबे गावचे असणाऱ्या महाडेश्वर यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्गातच झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. खेळाची आवड असलेले महाडेश्वर यांनी कबड्डीचे कोच म्हणूनही काम केले होते. महाडेश्वर ४० वर्षांहून अधिक काळापासून ते शिवसेनेत कार्यरत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!