राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार नवाब मलिकांना जामीन मंजूर
प्रकृतीच्या कारणावरून जामीन मंजूर, नवाब मलिक कोणत्या पवारांकडे लवकरच भूमिका स्पष्ट होणार?
दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळण्यासाठी मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. ते सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार न्यायालयात विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे ईडीने म्हणले आहे. नवाब मलिक सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात येणार आहे. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे नाव समोर आले होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यानंतर तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक कोणाकडे जाणार त्याची चर्चा सुरू आहे. नवाब मलिक शरद पवारांसोबतच असल्याचं बोललं जात आहे. पण आता ते बाहेर आल्यानंतर ते कोणाकडे जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.