आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा किल्ला ढासळणार
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे बारामतीतून शरद पवारांना चॅलेंज
बारामती दि ६ (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे अनेक किल्ले ढासळले आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती हा किल्ला देखील ढासळेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूकीत आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. बारामती लोकसभा मतदारसंघात याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पूर्णवेळ बाकामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यात सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. प्रत्येक वेळी त्या तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणची विकासाची काय स्थिती आहे. केंद्राकडून काय विकासाची अपेक्षा आहे, राज्य सरकारकडून या ठिकाणी काय करता येईल याचा आढावा त्या घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. गरिब कल्याणाच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचा देखील सीतारमण आढावा घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत.
तत्पूर्वी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु असे स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे असे थेट प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.