कंडक्टर आणि महिला प्रवासात फ्री स्टाईल हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, महिलांना प्रवासात सूट दिल्यानंतर वादात वाढ?
लातूर दि ३०(प्रतिनिधी)- अलिकडे महिलांच्यात होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस किंवा रेल्वे याठिकाणी तर हमखास वादाचे प्रसंग घडत असतात. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात सुट मिळाल्यानंतर होणाऱ्या वादांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. लातूर येथील बसस्टँडवर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशामध्ये जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओमध्ये महिला प्रवाशी कंडक्टरला मारहाण करत असून प्रत्युत्तरात कंडक्टरनेही सदर महिलेला मारहाण केली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बससमोर भरपूर गर्दी आहे. दोन महिला जोरजोरात भांडत आहेत. बस कंडक्टर आणि प्रवासी महिलेत हे भांडण सुरु आहे. प्रवासी महिला जोरानं बस कंडक्टर महिलेच्या कानाखाली मारत आहे तर कंडक्टर महिला स्वतःचा बचाव करत आहे. हा प्रकार सुरू असताना आजूबाजूला अनेक प्रवासी उभे असल्याचं दिसत आहेत. पण एकही प्रवासी यांचे भांडण सोडवताना दिसत नाही. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तर या मारहाणीचे कारण अद्याप समोर आले नाही. राज्य शासनाने महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्यानंतर महिला प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. पण बसमध्ये गर्दी झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये भांडणे झाल्याचे प्रकारही याआधी घडले आहेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
छप्पर उडणारी बस, पाणी गळणारी बस, हाताने वायपर फिरवून समोरील काचेवरचे पाणी साफ करणाऱ्या एसटी ड्रायव्हरच्या व्हिडिओमुळे एसटी आधीच वादात सापडली आहे. पण आता ही भांडणे चर्चेचा विषय ठरली आहेत. यापूर्वीही महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली आहेत.