शिक्षिका आणि खिचडी बनवणाऱ्या महिलेमध्ये जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी, नेमका वाद काय?
बीड दि ३०(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार आणि त्यावरून होणारे वाद आता काही नवीन नाहीत. पोषण आहारात होणार अपहार किंवा दर्जा यावरून हमखास वाद होत असतात. पण आता याच पोषण आहारावरुन महिला शिक्षिका आणि पोषण आहार बनवणारी महिला यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातील जोड हिंगणी जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार वाटपावरून शिक्षिका आणि पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या महिलेची फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जोड हिंगणी शाळेतील शिक्षिकेने आहार बनवणाऱ्या महिलेला निकृष्ट दर्जाचा आहार का बनवतेस असा सवाल विचारला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने थेट शिक्षिकेवर हल्ला चढवला. यावेळी दोघींनी एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी केली. इतर महिलांनी मध्यस्थी केल्याने हा वाद आटोक्यात आणला. खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून निकृष्ट दर्जाचा आहार देणे, अल्प प्रमाणात खिचडी देणे, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होत असतात, त्यामुळे आपण जाब विचारला असा दावा शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा होत असून काहींनी यात खिचडी बनवणारी महिलाच दोषी असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी शिक्षिका चुकीची वागल्याचा आरोप केला आहे. तर यात विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.