‘फुरसुंगी-उरुळी देवाची न. प.ला पहिल्या वर्षी ३०० कोटी उत्पन्न मिळेल’
माजी मंत्री विजय शिवतारे यांची आराखडाच सांगितला, आमदार जगतापांवर शेलक्या शब्दात टिका
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळण्याचा आदेश राज्य सरकारने ३१ मार्च रोजी काढला. त्यानुसार या गावांची मिळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे.
देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश ३१ मार्चला राज्य शासनाने काढला. या गावांमध्ये महापालिकेने मोठ्याप्रमाणावर कर आकारणी केली असुन तुलनेने पाच वर्षात कुठल्याच सुविधा न दिल्याने ही गावे वगळावीत, अशी मागणी विजय शिवतारे यांनी राज्य शासनाकडे केली होती. शिवतारे म्हणाले, की २०१७ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर महापालिकेने जिझिया कर आकारला होता. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष होता.यामुळे गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी चार महिन्यांपुर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लवकरच पुरंदर विमानतळ निर्मितीचे काम सुरू होणार आहे. यामुळे संपुर्ण पुरंदर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकास होईल. याचा लाभ या दोन्ही गावांना होणार आहे. नव्याने होणार्या नगर परिषदेला केवळ बांधकाम परवानगीतून ३०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळेल. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची संधी स्थानीक लोक प्रतिनिधींना मिळणार आहे. पण यावेळी काही प्रश्नांवर मात्र शिवतारे यांनी उत्तरे देणे टाळले आहे.
गावे वगळण्याला होणारा विरोध हा राजकीय असून, तब्बल ९९ टक्के स्थानिक नागरिक नगरपरिषदेच्या बाजूने आहेत. मात्र, काही मंडळी राजकीय विरोध करीत आहेत. स्थानिक आमदार संजय जगताप यांनी मिळकतकर कमी करतो, असे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासनपूर्ती करू शकले नाहीत, ते माठ आहेत, अशी टीकाही शिवतारे यांनी केली.