Latest Marathi News
Ganesh J GIF

गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणाची अटक टळली

पुणे: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते उघडून आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

आयुष अमृत कणसे (वय २१, रा. भरतगाववाडी, जि. सातारा) असे अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. त्याने ॲड. आकाश सुधीर चव्हाण यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून गौतमी पाटीलची ध्वनिचित्रफित प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहआरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अर्जदार आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याचा मोबाइल संच पोलिसांकडे तपासासाठी दिला आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद ॲड. आकाश सुधीर चव्हाण यांनी केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आयुष कणसे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!