Latest Marathi News
Ganesh J GIF

वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट बेतला पत्नीच्या जीवावर

भोपाळ : मध्य प्रदेशातील निवारी येथे लग्नाच्या २४  दिवसांनंतर एका वधूची तिच्या पतीने मित्रांसह निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय पतीला होता, यामुळे त्याने तिचा जीव घेतला. महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येत वापरलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे.

मृत महिला नीता केवटचा विवाह अवघ्या २४  दिवसांपूर्वी राममिलन नावाच्या तरुणाशी झाला होता. मात्र लग्नानंतर लगेचच दोघांमध्येही वाद सुरू झाला होता. मयत नीता ही सारखी माहेरी जाण्याचा हट्ट करत असायची. मात्र त्यामुळे राममिलन याला तिच्या चारित्र्यावर संशय येत असे. तिचा कोणाशी तरी अवैध संबंध आहेत, असे त्याला वाटत होते. याच संशयावरून त्यांच्यातील वाद वाढले आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली.

१२ तासांत पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

पोलिसांनी अवघ्या १२ तासात या हत्येचा उलगडा केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ७ जून रोजी नीता भिटारा या आपल्या गावातून शेतात जात असल्याचे सांगून निघाली. पण ती परतच आली नाही. दुसऱ्या दिवशी रोटेरा गौचरजवळ नीताचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केले.

गुन्ह्याचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी पुरावे गोळा करून नातेवाईकांचे जबाब घेतले. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, प्रेमप्रकरणाचा संशय असल्याने नीता हिचा पती राममिलन याने तिला ७ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले होते.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना केली अटक

ठरल्याप्रमाणे नीता भेटल्यानंतर तो तिला रौतेरा खिरकजवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे आरोपी पतीने त्याचे अन्य दोन साथीदार राजा केवट आणि मनीष केवट या दोघांच्या सहाय्याने नीताची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह अन्य दोन आरोपींना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!