गौतमी पाटील लवकरच झळकणार या मराठी चित्रपटात
चित्रपटाचे नावही ठरले, गाैतमीच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता
पुणे दि २४(प्रतिनिधी) – आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने स्वत:च चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
गौतमी पाटील कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहीली आहे. गौतमी पाटीलचे नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. ती सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. तिचे चाहते तिच्या लावणी कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. गौतमी घुंगरु या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. तिला काही दिवसांपूर्वीच ही ऑफर आली होती असं खुद्द गौतमीनं सांगितलं. ती म्हणाली,“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे.
लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील ही चर्चेत आली होती. विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. या सर्व प्रकरणानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.